Wednesday, 6 April 2016

तिने केला परिस्थितीवर जिद्दीचा वर्षाव


कहानी संघर्षाची; पळशीच्या डॉ. वर्षा खाडे महिलांसाठी प्रेरणादायी 


सातारा : तब्बल सात वर्षे पती कोमात... यम दारावरच उभा रहायचा... पण, मुलींना पाहिजे बाप, पतीची हवी साथ... आत्महत्येचा विचार मनाला चटके द्यायचा... तरीही रडले, पडले, पुन्हा उभे राहले. परिस्थितीला शरण जायचे नव्हते तर परिस्थितीवर स्वार व्हायचे होते. "यू कॅन फाइट, ऍनी इन्सिडंट' हाच निर्धार करून जगले, तरले. पण, जीवाच्या सख्याने साथ सोडलीच. तरीही संघर्षाची कहानी संपली नाही, ती सुरूच आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी!
डॉ. वर्षा खाडे या संघर्षाचे नाव. राहूरी ग्रामीण रुग्णालयाच्या त्या वैद्यकीय अधिक्षक. नानाविध कारणांनी आत्महत्येकडे जाणाऱ्या महिला, युवतींना प्रेरणादायी अशीच त्यांची ही जीवनगाथा. माण तालुक्‍यातील पळशी हे दुष्काळी गाव. 1993 मध्ये दहावीची परीक्षा झाली अन्‌ पळशीतीलच डॉ. अर्जुन खाडे यांच्याशी बाशिंग बांधले गेले. स्थळ चांगले आहे, म्हणून वडिलांनी घेतला हा निर्णय. लग्नानंतर बारावीपर्यंतची शिक्षण साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स घेतले. अर्जुन यांची जिद्द, वर्षांची खडतर परिश्रम पेलण्याची क्षमता, बुध्दीमता याची साथ जुळल्याने पुढील "एमबीबीएस'चे शिक्षण कऱ्हाडमधील कृष्णा मेडिकलमध्ये घेतले. त्याचवेळी 1995 मध्ये तोपर्यंत संसाराच्या वेलीवर "ऐश्‍वर्या'चे फुल उमलले.
पत्नीला सर्जन करण्याची पतीची इच्छा. पण, आर्थिक स्थिती कमकवत असल्याने त्यावर मात करण्यासाठी म्हसवड, गोंदवले येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून 2000 ते 2004 या कालावधीत नोकरीही केली. याच वेळी घरात "समृध्दी'नाम दुसरे फुल फुलले. तद्‌नंतर वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमधून 2007 मध्ये "एम. एस.' झाल्या. 2008 मध्ये फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. याच साली अर्जुन हे ग्रामपंचायतीचे सरपंच बनले आणि आनंदमय संसारात माशीच शिंकली. ता. नऊ नोव्हेंबर 2008 मध्ये काळाने घात केला. अविश्‍वासाच्या राजकारणावरून झालेल्या मारामारीत अर्जुन कोमात गेले, तर भाऊ आनंदा जागीच ठार झाली.
येथूनच सुरू झाला वेदनादायी संघर्ष. कोमात असलेले पती, दोन मुली, आई, लहान भाऊ, बहिण यांची जबाबदारी पडली. पतीच्या उपचारासाठी मदतीसाठी हात पसरले, पण निराशाच पदरी. पतीची सेवा करायची की नोकरी, नोकरी सोडली तर उपचार कसे करायचे, दोन संसार कसे सांभाळायाचे? डोक्‍यात विचारांचा हलकल्लोळ माजायचा. वाटायचे आत्महत्या करून संपवूया. पण, त्याच वेळी माझ्या मुलींना बाप पाहिजे, पतीची साथ हवी हे विचार मनाला घट्ट करायचे. चार धीराचे शब्द सांगण्यासही कोणी नव्हे. रडले, पडले, पण पुन्हा उभी राहिले. "फॅमिली लाइफ' मिळालेच नाही. संकटांचा डोंगर असतानाच 2014 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची "वैद्यकीय अधिक्षक वर्ग एक' पदाची परीक्षा दिली. त्यात निवडही झाली. जीवनात एक आनंदाचा क्षण आलाही पण, लगेच ता. तीन सप्टेंबर 2015 ला नियतीने घाला घालत "पती छत्र' नेले. कुटुंबासाठी तर जगतेच आहे, पण आता जगायचे आहे, ते स्त्री सक्षमीकरणासाठी.

""परिस्थितीसमोर हार मानू नका. जिद्द लढण्याची तयारी ठेवली तर काहीही शक्‍य करू शकता. मनात जरी आत्महत्येचा विचार आला तर मुलींनो, महिलांनो मी तुमच्यासाठीच आहे. आपण, मिळून लढूया.''

डॉ. वर्षा खाडे.

No comments:

Post a Comment